प्रिय
उत्तम ,
तू निघून गेलास...
अगदी अनपेक्षितपणे...
या घटनेला आज चार वर्षे पूर्ण होताहेत...
दुःख वियोगाची ही भळभळती जखम आजही आमच्या अंतःकरणात सलते आहे.. पण तरीही तू दिलेल्या आश्वासक विचारांनी पुन्हा नवी झेप घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोहोत.. तुला अपेक्षित असलेल्या सम्यक परिवर्तनाच्या दिशेने...
तू उत्तम नव्हे तर सर्वोत्तमच होतास... तुझ्या आयुष्याच्या जडण घडणीत आईवडिलांचे अथक परिश्रम.. त्यांनी घेतलेले अखंड कष्ट.. आणि पुढे तुझ्या कृतिशील आणि विचारशील वाटचालीला समर्थ साथ देणारी तुझी सहचारिणी नीलम... सुकन्या संबोधी आणि समस्त पवार कुटुंबिय... या सर्वांचा भक्कम आधार तुला मिळाला हे अधोरेखित करावं लागेल
त्याचबरोबर तुझ्या समग्र सामाजिक चळवळीच्या प्रवासात तुला सहकार्य आणि सहयोग देणारे तुझे सच्चे दर्पणसाथी.. मित्रपरिवार यांच्या साथीने आंबेडकरी चळवळीचा डोलारा समर्थपणे पुढे नेताना आम्ही तुला जवळून पाहिलेय... सामाजिक कार्य करताना चळवळीतील बरे -वाईट चढ उतार तू तुझ्या चाणाक्ष बुद्धीने लिलया पार करत फुले शाहू आंबेडकरी विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन युवा कार्यकर्त्याला नवी उभारी देत राहिलास... तू नेहमी म्हणायचास, मला कवी म्हणून मिरवण्यापेक्षा फुले आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून संबोधून घेणं जास्त महत्त्वाचे वाटते... तू उत्तम कवी होतास..पण त्यापेक्षा उत्तम कार्यकर्ता होतास... आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत तू हे खरं करून दाखविलेस...
एक विद्रोही कवी आणि हाडाचा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून वावरताना सभोवतालच्या वास्तववादी परिस्थितीचे पडसाद सतत तुझ्या संवेदनशील मनावर होत राहिले.. त्यामुळेच तुझ्यातला सच्चा कार्यकर्ता वर्तमानाच्या संदर्भांचा नव्याने शोध घेत राहिला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाचा आणि मानवमुक्तीचा ध्यास उराशी बाळगून फुले आंबेडकरी युवाशक्तीचे विचारशील आणि कृतिशील क्रांतिचक्र ठरलेल्या दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात तू घेतलेला पुढाकार आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास पंचवीस वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी जनतेला प्राप्त करून दिलेला चळवळीचा नवा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे..
दर्पण सांस्कृतिक मंच कणकवलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या समारोपानंतर तुझ्या संकल्पनेतील संस्थेची व्याप्ती आधिकाधिक वाढावी या उद्देशाने फुले -आंबेडकर दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग असे व्यापक नामाभिधान करून सर्व कार्यकर्त्यांच्या सहयोगाने संस्थेचे कार्य सुरू केलेस... पण या नुतन संस्थेच्या सामाजिक वाटचालीला दोन वर्षे पुरी होता न होताच तू अपघाताने अनपेक्षित निघून गेलास... अगदी कायमचाच...
कायिक अस्तित्वाने जरी तू आमच्यात नसलास तरी मनामनात तुझ्या कार्याचे स्फूर्तिदायक अस्तित्व आजही जाणवतेय.. आणि पुढेही जाणवेल..
आपला रस्ता आपणच चोखाळला पाहिजे.. कुठलंही प्रस्थापित नेतृत्व न स्वीकारता सार्वत्रिक उठावाचं आंदोलून उभारून क्रांतीचा रस्ता गाठलाच पाहिजे.. कधी मोर्चा.. आंदोलनात.. कधी सभा, संमेलनात.. तर कधी कवितांच्या शब्दाशब्दात अशी हाक तू देत राहिलास... सत्तेच्या आतबाहेर या कविता संग्रहातील प्रत्येक कविता हा तुझ्या आंबेडकरी कृती उक्तीचा दस्ताऐवज चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या हवाली करून तू निघून गेलास.. इथल्या समाज रचनेविषयी तुझ्या मनात असलेली प्रचंड चीड.. जातियतेच्या विषाणूविरूद्ध तुझा विद्रोह.. शब्दाशब्दातून आजही जाणवतोय...उत्तम ! खरच.. तू कृतिशील विचारांचा चालताबोलता कवी.. कार्यकर्ता होतास...
आज दहा एप्रिल तुझा जन्मदिन..
तू आमच्यात शरीराने नाहीस.. हे विदारक वास्तव स्वीकारून तुला जन्मदिनीच आदरांजली अर्पण करताना हृदय हेलावतेय... तरी सुद्धा काळजाचा दगड करून तुझे कार्य पुढे नेण्यासाठी सरसावलेले दर्पणसाथी तुझ्या जन्मदिनानिमित्त गेली तीन वर्षे 'जागर क्रांतीचा ' जिल्हास्तरीय जयभिम गायन पार्टी स्पर्धा आणि महारक्तदान शिबीराचे आयोजन करून तुझे अधुरे कार्य पुढे नेताहेत.. तुझ्या पश्चात स्थापन झालेल्या दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या नुतन संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम आणि त्यांची कार्यकारिणी अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबवून जिल्हयातच नव्हे तर राज्यस्तरापर्यंत चळवळ मोठ्या ऊर्जेने पुढे नेताहेत..
याही वर्षी तुझ्या जन्मदिनाचे औचित्य साधून जयभिम गायन पार्टी स्पर्धा आणि महा रक्तदान शिबिराबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक गीत गायन स्पर्धा अर्थात दर्पण लिटील चॅम्प्स आणि तुझ्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार वितरण सोहळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे... पण सध्या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे संपूर्ण जग मोठ्या संकटाला सामोरे जात असताना देशात लाॅकडाऊन सुरू असल्याने या वर्षी सदर कार्यक्रम स्थगित करावा लागतोय... पण पुढे आम्ही निश्चितच घेणार आहोत... कारण संस्थेला एक व्यापक चेहरा प्राप्त व्हावा हा यामागचा प्रामाणिक उद्देश आमचा आहे.. ही तर सारी तुझीच प्रेरणा.. कारण तूच म्हणायचास ना.. बाबासाहेब डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घेऊन कामाला लागा.. येणारा काळ आपलाच आहे.. उद्याची निळी पहाट आपलीच आहे... तुझे हे आश्वासक शब्द नवी ऊर्जा घेऊन उभी आहे.. प्रत्येकाच्या रोमरोमात!
तुला आज अभिवादन करताना डोळ्यात आसवांचा महापूर दाटून येतोय... पण दुसरीकडे नवी झेप घेताना आजुबाजुचे वास्तव वर्तमान खुणावतेय आम्हाला की, रडून नव्हे तर लढून बघा... तिच खरी आदरांजली ठरेल...
उत्तम खरं तर तुझा वावर प्रत्येक संस्थेशी, चळवळीशी आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांशी होता... आंबेडकरी कार्यकर्ता मग तो कुठल्याशी संस्थेचा ,चळवळीचा असो... प्रत्येकाशी तू समान न्यायानेच लागायचास... त्यामुळे तुझ्या अकाली निधनाने समस्त आंबेडकरी समाजात मोठी पोकळी निर्माण झाली... आज तू प्रत्येकासाठी हवा होतास! कारण आजही आपल्याच जाती-जातीत अंतर्गत मतभेद.. वैचारिक मतभिन्नता.. मनभिन्नता आहेच.. काही ठिकाणी तर स्वयंघोषित नेतृत्वाची आत्मलोभी भावना वाढीस लागते आहे..ही आंबेडकरी चळवळीची खरी शोकांतिका आहे... आणि या बेसावधतेचा फायदा घेत प्रतिक्रांतीची शस्त्रे निडर होताहेत.. या विखारी शस्त्रांना वेळीच रोखायचे असेल तर सर्वांनी सारे मतभेद विसरून एकाच विचारप्रवाहात एकत्र येऊन सम्यक परिवर्तनाची आणि सामाजिक एकसंघतेची भावना रूजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर मला वाटते आजच्या जन्मदिनी तुला तिच खरी आदरांजली ठरेल... नाही का?
तुझ्या स्मृतिंना त्रिवार अभिवादन!!!
जयभिम...
राजेश कदम
अध्यक्ष
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग
No comments:
Post a Comment
संदेश