जयभीम मित्रहो , दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या आमच्या संस्थेचा अधिकृत ब्लॉग आम्ही सुरु करीत आहोत .या blog च्या माध्यमातून संस्थेचे सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक उपक्रम तसेच भूमिका आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच आपल्यातील विविध क्षेत्रात असलेली कौशल्ये , कला ,साहित्य यासाठी एक ई -मंच उपलब्ध करून देणे तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक पुस्तके व आपल्या कार्यकर्त्यांनी केलेले लेखन -साहित्य प्रदर्शित करणे यासाठी हा blog उपयुक्त ठरेल .तरी आपण सर्वांनी या blog ला अवश्य subscribe करा.जेणेकरून या blog वरील नवीन प्रदर्शित माहिती/पोस्ट तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचेल.तसेच या blog च्या खाली उजव्या बाजूस असलेल्याshare icon वर क्लिक करून आपल्या मित्र मैत्रीणीना blog वरील माहिती शेअर करा. धन्यवाद !
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन
उत्तम पवार यांना विनम्र अभिवादन

Tuesday, July 21, 2020

उत्तम पवार स्मृतिदिन - अभिवादन - २२ जुलै

समतेसाठी सूर्याला डांबर फासणारा विद्रोही कवी:उत्तम पवार

     आपण ज्यांच्यासोबत आपल्या जीवनातील सुखदु:खाचे क्षण वाटून घेतो,जगण्याच्या पाऊलवाटेला राजमार्ग बनवण्यात ज्यांचा मोलाचा त्यागपूर्ण वाटा असतो व ज्यांचं नसणं आपण कधीच सहन करू शकत नसतो अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात नवी ऊर्जास्थल बनून राहतात.पण निसर्गाने आपल्या कालाच्या गतिमान चक्रात अनेक चित्रविचित्र घटना गुंफलेल्याच असतात जणु.! नाहीतर काही दिवसांपूर्वी काही काळ-वेळेेपूर्वी आपल्याशी जीवाभावाच्या गप्पा मारणारी अनमोल रत्नं काळाच्या हाकेला प्रतिसाद देत अनाहुतपणे का बरं निघून जातील..? आम्हा फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनी च्या वाटचालीत असाच एक काळा दिवस प्रचंड वेदना देऊन गेला.
२२ जुलै २०१६ चा दिवस असा अंधकार घेऊन आम्हा कार्यकर्त्यांच्या आयुष्यात आला व
आमचा प्राणप्रिय मित्र उत्तम पवार याला आमच्यापासून हिरावून घेऊन गेला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी जगतात या घटनेने दु:खाची काळी छाया पसरली. सारी बौद्ध जनता व परिवर्तन चळवळ व उत्तमशी जिवाभावाचे संबंध असणारा जनसागर हळहळला. मुंबईत ही बातमी थडकताच अमृतमहोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यावरही शोककळा पसरली .आमचा हा लाडका मित्र आम्ही भौतिक दृष्टीने कायमचा गमावून बसलो. पण आपल्या कार्याच्या ऊर्जस्वल प्रतिभेचा अमीट ठसा कायमचा कोरून गेला.!त्याच्या या आकस्मिक  'एक्झिट ' ने कार्यकर्त्यांबरोबरच त्याचा लाडकी कन्या संबोधी व पत्नी नीलम, त्याचा सारा  गोतावळा यांना भयंकर हादरा बसला. या प्रसंगातून सावरणं त्यांच्यासाठी मोठी अग्निपरीक्षा होती. पण गेली चार वर्षे अत्यंत खंबीरपणे कठिण मानसिक धक्का पचवत त्याच्या पत्नीने आपल्या मुलीला उत्तमरीतीने सांभाळले. तिला तिच्या माहेरच्या मंडळींनी फार मोठा धीर देत बळ दिलं.
  आपल्या धारदार शब्दांच्या लेखणीने स्वत:ला प्रस्थापित समजणा-या साहित्यिक, व्यवस्थापकांना शेलक्या शब्दांत सुनावणारा, पुरोगामित्वाच्या गप्पा केवळ स्टेजवर मारत एरवी आपल्या घरांत शहाजोगपणे परंपरा जपणा-या भंपक भडव्यांना कवितेतून खडा सवाल करून 'मुतापुरती चोटली हातात ' धरणा-या मानसिकतेला सपशेल नाकारणारा एक विचारी पँथर म्हणजे विद्रोही कवी कार्यकर्ता दिवंगत ' उत्तम पवार ' !
आपल्या कवितेतून छिनाल व्यवस्थेला 'का रे?' हा प्रश्न करणा-या , सिंधुदुर्गातील आंबेडकरी व परिवर्तनवादी कवितेला नवा तोंडवळा प्राप्त करून दिला.या लाडक्या मित्राचं चार वर्षांपूर्वी एका रस्ता अपघातात आकस्मिक निधन झालं.आज २२ जुलै २०२०..!त्याचा चतुर्थ स्मृतिदिन!त्याच्यासोबत चळवळीत  अर्धपोटी काम करतानाचे दिवस भारावलेले होते.एका उमद्या कवी व कार्यकर्त्यांला सहप्रवासी मित्रांचं हे मनस्वी भावाभिवादन!!!
       उत्तमने आपल्यातला संघटनकौशल्याचा हातोटीने वापर केला . सन १९९० च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष व महात्मा फुले स्मृतिशताब्दी वर्षात कणकवली तालुक्यातील बौद्घ समाजातील गरीब व  शिकण्याची आस बाळगून कणकवलीसारख्या शहरात गोळा झालेल्या मुलांच्या मनात बुद्ध फुले आंबेडकर यांच्या विचारांचे बाळकडू पाजत त्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उपक्रमशील मालिकांची बलदायी रसद पुरवत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण सम्यक विकास घडवला.त्यासाठी ' दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली ' ही संस्था सलग पंचवीस वर्षे व पुढे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग असे नामाभिधान करत अखंड चालवली. तत्पूर्वी ' छात्रभारती ' या समाजवादी विचारांच्या विद्यार्थी संघटनेची कुशल पार्श्वभूमी लाभलेला यी कार्यकर्त्याने स्वत:च्या नेतृत्वगुणाच्या जोरावर निष्ठेने आंबेडकरी तत्त्वज्ञान जोपासणारी युवकांची व कार्यकर्त्यांची फळी उभारली. पंचवीस वर्षे या संस्थेच्या यशस्वी वाटचालीत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विविध परिसंवाद, चर्चासत्रे, गटचर्चा, धम्मपरिचय शिबीरे ,विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम कार्यकर्त्यांच्या विचारमंथनातून राबवले व कणकवली तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला उत्तम पवार हा आपल्या जिवाभावाचा सखा वाटू लागला होता. कोणत्याही गावात त्याच्यासोबत तुम्ही गेलात की त्याच्याभोवती तरूणांबरोबरच गरीब व वयस्कर कार्यकर्त्यांची गर्दी जमायची. त्याला मानणारा हा सगळी वर्ग त्यावेळी  'दर्पणवाले ' म्हणून आम्हाला ओळखायचे. त्याच्या नेतृत्व व सहवासातून पुढे आबा शेवरे यांच्यासारखा खारेपाटण कोर्ले येथील वैचारिक बैठक पक्की असलेला  सम्यक कविमाणूस भेटला. त्यांच्या मार्गदर्शक सिद्धांतातून ' सम्यक साहित्य संसद ' सारखी साहित्य संस्था सुनिल हेतकर, अनिल जाधव, राजेश कदम ,मधुकर मातोंडकर, अरूण नाईक या मित्रांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या आंबेडकरी विश्वात नावारूपास आणली. माझ्यासारख्या बाळबोध जीवन जगणा-या शालेय विद्यार्थ्यांला उत्तमने चळवळीचा शाहीर बनवला होता. दर्पणचा कोणताच कार्यक्रम सिद्धार्थ तांबे याच्या आंबेडकरी गीताशिवाय सुरू व्हायचा नाही. पण पुढे गायकाबरोबरच एक वक्ता व कवी म्हणून घडविण्यात उत्तमचा डोंगराएवढा वाटा आहे. त्याची माझा कवितासंग्रह निघावा अशी तीव्र इच्छा होती. पण त्याच्या आकस्मिक निधनाने ती पूर्ण नाही करता आली. पण या वर्षी ती पूर्ण करण्याचा संकल्प करतोय. उत्तमने दर्पणच्या विचारमंचावर महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ मानवंत व विचारवंत यांना आणून कणकवलीकरांना श्रोतापन्न केले.
दर्पणचे  ' वार्षिक स्नेहसंमेलन ' म्हणजे या जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीची वैचारिक मंथनाची शिदोरीच होती. यातून या जिल्ह्यात समतावादी विद्यार्थी संघटना, सत्यशोधक विद्यार्थी संघटना , समता प्रतिष्ठान, विद्रोही साहित्य चळवळ या समांतर चळवळी पुढील काळात उदयास आल्या. पण या सा-यांचं उगमस्थान  'दर्पण '  आहे हे सारेच मान्य करतील. ' सत्तेच्या आतबाहेर ' या कवितासंग्रहाने मराठी कवितेच्या प्रांतात स्वत:चा एक स्वतंत्र स्वाभिमानी ठसा उमटवला. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्याच्या कवितेचा दोन तीन वेळा समावेश झाला आहे. कोणत्याही पुरस्काराच्या रांगेत उभं न राहता
 ' *मला कवी म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून ओळखले तर मला माझ्या कवितेचा अधिक सन्मान वाटेल '* असं त्याने आपल्या कवितासंग्रहाच्या  मनोगतातून मांडलेच आहे. आंबेडकरी युवा पिढीच्या बिघडत चाललेल्या मानसिकतेची त्याला मनस्वी चीड होतीच ,पण सत्तेसाठी आत्मप्रशंसेत अडकलेल्या सत्ताधारी लोकांच्या मागे फिरणा-या युवा नेतृत्वाबद्दल तो नाराज होता. त्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून याचं चित्रण केलंच आहे. बौद्ध समाजातील बेळे व पान या अंतर्गत पोटजातीमुळे निर्माण झालेल्या दरीबाबत तो दोन्ही बाजूच्या मंडळींना तेवढंच जबाबदार मानत असे.म्हणून
  ' पानबेळे ' या त्याच्या सृजन प्रकाशित पोस्टर पोएट्रीत
' मी नाही बेळ्यांचा.. मी नाही पानांचा.. मी फक्त आंबेडकरांचा ' असे  व्यवस्थेला फटकारले आहे.बौद्धानी आत्मशोधन करत स्वयंप्रकाशी पिढी निर्माण करावी अशी त्याची ठाम भूमिका होती व तो त्यावर नेहमीच ठाम होता. त्याच्या या काही कवितांतून त्याला आजच्या या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना त्याच्या अंतरंगातील बुद्ध निष्ठेची ज्योत कार्यकर्त्यांनी सामान्य जनमानसात प्रज्वलित ठेवावी अशी माफक अपेक्षा बाळगतो. त्याच्या अमर कविता तशाच ताज्या टवटवीत धारदार राहतील. त्याच्या अभंग चेह-यासारख्याच..!

*सत्तेच्या आतबाहेर.. (काही कविता )*
-----------------------------------
१. अंधाराचे रंग

सूर्याला डांबर फासून अंधार करावा
आणि इथे नांदणा-या छिनाल समाजव्यवस्थेचा चुराडा व्हावा
उपेक्षितांच्या जुलूमग्रस्त जीवनास
गिळंकृत करू पाहणा-या
शोषणव्यवस्थेचा अंत व्हावा।
सत्तेसाठी तत्त्व खुंटीला अडकवणा-या
सत्तापिपासू भडव्यांना कॅन्सर व्हावा !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   २. ' अ 'श्लोक

रचिले गा तुम्ही । कुभांड कथांचे।
गाडिली बीजे। समतेची ।।
ऐसा कैसा धर्म । माहेर जातीचे ।
ना होये अदलाबदल। वरखालती ।।
तुम्हा काय पुसावे ।गटार किती काळचे ।
आम्ही शोधिले मार्ग । मानवमुक्तीचे ।।
•••••••••••••√•••••••••••√••••••••••••√•••••
३. सत्तेच्या आतबाहेर

मित्रा,
हल्ली भेटतोस वरचेवर,
खूप चर्चा करतोस.
पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे
चळवळीचं नंतर बघता येईल
प्रश्न रस्त्याचा मिटला नाही तरी
आपला रस्ता शोधला पाहिजे
खांद्यावर झेंडा कुणाचा ?
ओठांवर घोषणा कुणाची ?
भिंतीवर कॅलेंडर कुणाचे ?
- - - - ?
या प्रश्नावर तूच बोलतोस हे बरं आहे
आत्मशोधाची जाणीव होते हेही बरं आहे
उशीरा का असेना
सत्तेच्या आतबाहेर
कार्यकर्ता मरतोय हे समजलं
तेवढं पुरे आहे।

*शब्दांकन :*
प्रा.सिद्धार्थ गोपाळ तांबे*
      *माजी अध्यक्ष दर्पण*
               तथा
            *सचिव*
        *सम्यक साहित्य संसद*
                 *सिंधुदुर्ग*



1 comment:

संदेश

Featured Post

पुस्तकांवर बोलू काही